लंडन –
ब्रिटनमध्ये ७० वर्षांतला पहिलाच राज्याभिषेक सोहळा शनिवारी पार पडला. या सोहळ्यात इंग्लंडचा राजा चार्ल्स तिसरा यांचा ब्रिटन आणि १४ राष्ट्रकुल देशांचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. यावेळी राजाच्या ताफ्यातील एक घोडा भलताच बेलगाम झाला आणि थेट उपस्थितांच्या गर्दीत घुसला. यामुळे उपस्थित लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राजा चार्ल्स तिसरा वेस्टमिन्स्टर अॅबेहून बकिंगहॅम पॅलेसला परतल्यानंतर काही मिनिटांत ही घटना घडली. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, राज्याभिषेक मिरवणुकीत सामील असलेला एक घोडा गर्दी पाहून बिधरला. घोडेस्वाराने त्याचा लगाम खेचण्याचा प्रयत्न केला. या घोड्याने पाठीमागे सरकत चक्क उपस्थित लोकांच्या गर्दीत मुसंडी मारली. त्यामुळे उपस्थितांची धावपळ उडाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्याची भरपूर चर्चा झाली.