लीड्स – शहरात काल अचानक किरकोळ कारणाने हिंसाचार उफाळून आला. हिंसक जमावाने जागोजागी आगी लावल्या. एक डबल डेकर बस आणि पोलिसांची गाडीही पेटवली. एका शिक्षण संस्थेत पालकांना मुलांना सोडून निघून जायला सांगितल्यामुळे हा हिंसाचार उसळला. काल संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरू झालेला हा हिंसाचार साडेदहा वाजेपर्यंत सुरू होता.
लीड्स शहरातील हेअरहिल्स या भागातील एका शैक्षणिक संस्थेने दिलेल्या आदेशाने आपापल्या मुलांना घेऊन आलेल्या पालकांनी संतप्त होऊन आंदोलन सुरू केले. यावेळी जमावाने रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांनाही आग लावली. पोलिसांच्या एका वाहनाच्या खिडकीच्या काचा फोडल्या.नंतर ते वाहन उलटून टाकले व या वाहनाला आग लावली. जमावाने अनेक वस्तू रस्त्यावर आणून त्यांना आगी लावल्या. जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. पोलिसांनी जमावाला शांत करून आपापल्या घरी जाण्याची विनंती केली. साडेदहा वाजता हिंसाचार थांबवल्यानंतर पोलिसांच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने टेहाळणी करण्यात येत होती. या जाळपोळीत कोणी जखमी झाले नसल्याचे यॉर्कशायर पोलिसांनी सांगितले आहे.