लंडन – ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक हे महाराज चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात बायबलचा काही भाग वाचणार आहेत. येत्या 6 मे रोजी हा सोहळा होणार आहे. विशेष म्हणजे सुनक हे हिंदू धर्म मानतात आणि त्याच्या परंपरेचे काटेकोर पालनही करतात.
आर्चबिशप ऑफ कँटरबरीच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. अन्य धर्मांचे सदस्य पहिल्यांदाच या सोहळ्यात सामूहिक प्रार्थनेत सक्रिय भूमिका निभावणार आहेत. ‘बिब्लिकल बुक ऑफ कोलोसियन’ असे या प्रकाराला म्हटले जाते, ज्यात बायबलचा काही अंश वाचला जातो.
सुनक हे भारतीय वंशाचे पहिले असे ब्रिटिश पंतप्रधान आहेत, जे हिंदू धर्माचे पालन करतात. अन्य धर्मीयांकडून बायबल वाचून ख्रिस्ती समारंभात बहुधार्मिक विश्वासावरील संकल्पनेचे उदाहरण समोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार, अनेक धर्मांचे प्रतिनिधित्व करणार्यांना एकत्र आणत त्यांच्याकडून बायबलसंबंधित पुस्तकातील उतारा वाचून घेण्यात येईल. अनेक ख्रिस्ती धर्मगुरूदेखील या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. येशूने सांगितलेल्या नियमांचेदेखील यावेळी वाचन होणार आहे.
राजघराण्यातील अशा धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी सरकारचा प्रतिनिधी म्हणून पंतप्रधानांना उपस्थित राहावे लागते. कँटबरीचे आर्कबिशपच राज्याभिषेकासाठी नियम ठरवतात. राजाला तीन प्रकारच्या शपथ घ्याव्या लागतात. या प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ख्रिस्ती धर्माचीच एक शाखा असलेल्या ‘प्रोटेस्टंट रिफॉर्म्ड रिलिजन’च्या रक्षणाचे वचनही राजाला द्यावे लागते. याशिवाय जनतेसह ईश्वराच्या सेवेची शपथ घ्यावी लागते. यंदा प्रथमच अन्य धर्मांचे सदस्य पहिल्यांदाच या राज्याभिषेक सोहळ्यात सक्रिय सहभाग घेणार आहेत. हिंदू परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे 84 वर्षांचे स्वामी नरेंद्र बाबुभाई पटेल हे चार्ल्स यांना अंगठी प्रदान करतील, 90 वर्षीय स्वामी इंद्रजीत सिंह हे शीख धर्माचे प्रतिनिधित्व करत कोरोनेशन ग्लोव्ह देतील. मुस्लीम समाजाच्या वतीने सय्यद कमाल हे चार्ल्स यांना ब्रेसलेट प्रदान करतील. राजवाड्याने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी म्हणून ऋषी सुनक यांच्याद्वारे बायबल वाचन होणार आहे. सुनक यांनी हे वाचन केल्यानंतर किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला हे पवित्र मानले जाणारे भोजन करतील. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी युनायटेड किंग्डमसह इतर अनेक देशांमधले काही निवडक पाहुणे येणार आहेत. 6 मे रोजी वेस्टमिन्स्टर एबे येथे हा धार्मिक समारंभ पार पडणार आहे.
ब्रिटनचे हिंदू पंतप्रधान सुनक राज्याभिषेकाला बायबल वाचणार
