नवी दिल्ली – महिला पैलवानांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलीस भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती संघाचे प्रमुख ब्रजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी तयार आहेत, अशी माहिती महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे आता ब्रजभूषण यांच्या अडचणी वाढणार आहेत. सुनावणीच्या वेळी कुस्तीपटूंच्या वतीने युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाकडे कुस्तीपटूंच्या सुरक्षिततेची मागणी केली. महिला कुस्तीपटूंना धमक्या मिळत आहेत. तक्रारदारांना दिल्लीबाहेर पाठवावे लागले, असे सिब्बल म्हणाले. अल्पवयीन कुस्तीपटूंना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले. पोलिसांना प्रतिज्ञापत्रही देण्यास सांगण्यात आले आहे. ब्रजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणप्रकरणी एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाटसह अनेक पैलवान 23 एप्रिलपासून आंदोलन करत आहेत.
नीरज चोप्राचेही समर्थन
अनेक राजकारणी पैलवानांच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत. दरम्यान, कुस्तीपटूंना ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचीही साथ मिळाली आहे. नीरज चोप्राने ट्वीट करत कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणार्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, असे ट्विट नीरजने केले आहे.