मुंबई- गुजरातमधील बेस्ट बेकरी हत्याकांडप्रकरणाचा निकाल आज मुंबई सत्र न्यायालयातीलविशेष न्यायालयाने पुन्हा एकदा पुढे ढकलला आहे. या प्रकरणी राखून ठेवलेला निकाल न्यायालय 2 जून रोजी जाहीर करणार आहे. बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणात एकूण चार आरोपीविरुद्ध खटला सुरु होता. यातील दोघांचा खटला सुरु असताना मृत्यू झाला होता.
1 मार्च 2002 रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीवर जमावाने हल्ला केला. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस जाळल्यानंतर ही घटना घडली. जमावामध्ये हर्षद सोलंकी आणि मफत गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. हे दोघे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्याच खटल्यावर कोर्ट बुधवारी निकाल जाहीर करणार होते. मात्र हा निकाल पुन्हा एकदा पुढे ढकलला आहे.