मुंबई – बेस्टच्या बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने घातलेल्या गोंधळामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला. या प्रवाशाने चालकावर हल्ला केल्याने बसचा अपघात झाला. काल रात्री मुंबईतील लालबाग मध्ये ही घटना घडली.
काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ६६ क्रमांकाची बस राणी लक्ष्मीबाई चौकाच्या दिशेने जात होती. यावेळी लालबागच्या गणेश टॉकीज जवळ एका मद्यपी प्रवाशाची बस चालकाबरोबर बाचाबाची झाली. मद्यपीने चालकावर हल्ला केला व बसचे स्टेअरिंग ओढले. त्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला व बस रस्त्यावरील काही वाहनांना व पादचाऱ्यांना धडकली. यामध्ये ९ पादचारी जखमी झाले. यातील दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील नुपूर सुभाष मणियार या २७ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमींपैकी श्रेया मणियार यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दत्ता शिंदे असे या मद्यपी प्रवाशाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.