कोल्हापूर – बेळगावात ९ डिसेंबरला होणार्या महाराष्ट्र एकीकरण (मराठी भाषिक) समितीच्या महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.महामेळावा घेण्याचा समितीने प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अतिरिक्त पोलीस महासंचालक एच.हितेंद्र यांनी दिला.बेळगावमध्ये ९ डिसेंबरपासून कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे.त्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेणार आहे.
बेळगावात ९ डिसेंबरपासून होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांची एच.हितेंद्र यांनी सुवर्णसौध येथे बैठक घेतली.या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महामेळाव्याला परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मागच्या वर्षी देखील महामेळावा आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राच्या हद्दीत महामेळावा घेतला होता,असेही एच.हितेंद्र यांनी सांगितले.महामेळावा घेण्यास परवानगी द्यावी म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले होते.