वॉशिंग्टन
अमेरिकेतील टेक्सास राज्यात शक्तिशाली बेरिल चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे आतापर्यंत एका पोलीस कर्मचाऱ्यासह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे सुमारे ३० लाख घरे आणि व्यावसायिक आस्थापनांचा वीज पुरवठाही खंडित झाल्याने सर्वत्र अंधार झाला आहे.
राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने काल संध्याकाळी सांगितले की, बेरिल वादळाने माटागोर्डाजवळ उग्र रूप धारण केले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव येथील शाळा, व्यावसायिक आस्थापने, कार्यालये आणि वित्तीय संस्था बंद करण्यात आल्या. पूर्व टेक्सास, पश्चिम लुइसियाना आणि अरकान्ससच्या काही भागात पूर आणि जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यादरम्यान घरांवर झाडे पडल्याने २ लोकांचा मृत्यू झाला. तसेच पुराच्या पाण्यात अडकून ह्यूस्टन पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर येथे एक आगीची घटना घडली त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सध्या आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे मूल्यांकन सुरू केले आहे. स्थानिक लोकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापौर जॉन व्हिटमायर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ” आकाश निरभ्र असले तरी धोका टळला आहे असे समजू नका. अजूनही परिस्थिती बिकट आहे. किती नुकसान झाले आहे याबाबत सध्या काही सांगता येणार नाही.”