मुंबई- मराठी उद्योग जगतातील मोठे नाव आणि व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल वसंत बेडेकर यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक व्यवसायात मोठे नाव होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. उपचारादरम्यान काल रात्री १२.३० च्या सुमारास एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
१९१० मध्ये व्ही. पी. बेडेकर यांनी बेडेकर समूह आणि मसाले, लोणची, पापड इत्यादी पारंपरिक पदार्थांचे दुकान गिरगावात सुरू केले होते. त्यानंतर या व्यवसायात सक्रिय होण्यासाठी त्यांचे चिरंजीव व्ही. व्ही. बेडेकर यांनी १९१७ मध्ये वेगवेगळे मसाले बाजारात आणले. त्यांनी १९२१ मध्ये लोणची बाजारात आणली, त्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर गिरगावातील ठाकूरद्वार, फोर्ट, परळ आणि दादर येथे बेडेकर मसाल्यांची दुकाने सुरु झाली. बेडेकर ब्रँड आणि त्यांची उत्पादने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये लोकप्रिय आहेत. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोपीय देशांत त्यांची उत्पादने पोहोचली आहेत. वाढती मागणी लक्षात घेत बेडकर उद्योग समुहाने पाच नवीन उत्पादन युनिट्स सुरु केली आहेत. १९४३ मध्ये त्यांनी खाजगी लिमिटेड कंपनी म्हणून स्थापन केली. त्याची सध्याची उलाढाल १०० कोटींहून अधिक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक अतुल बेडेकर यांना श्रद्धांजली वाहिली. शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचा धडाडीचा वारसदार हरपला. शतकोत्तर वाटचालीत बेडेकर परिवाराच्या उद्योग समुहाने मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केले आहे. या उद्योग समुहाच्या चौथ्या पिढीचे अतुल प्रतिनिधीत्व करत होते. त्यांनी आपल्या धडाडीने या उद्योग समुहात काळानुरूप बदल घडवून घोडदौड चालू ठेवली होती. त्यांच्या निधनामुळे जुन्या – नव्या पिढ्यांच्या दरम्यानचा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. त्यांच्या अकाली निधनाने झालेला आघात सहन करण्याची बेडेकर परिवाराला शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
बेडेकर मसालेचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन
