इस्लामाबाद – गैर इस्लामी पद्धतीने विवाह केल्याच्या खटल्यातून इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.मात्र अन्य तीन प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याने त्यांचे वास्तव्य तुरुंगातच राहणार आहे.
पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर इम्रान खान यांना इस्लामाबादमधील न्यायालयाने या खटल्यात दोषी ठरवले होते.इम्रान खान आणि बुशरा बिबी यांचा विवाह गैर-इस्लामी पद्धतीने झाल्याचा आरोप बुशरा यांच्या पूर्वाश्रमीचे पती खावर फरीद मानेका यांनी केला होता. इस्लामी मान्यतेमध्ये महिलेने घटस्फोट घेतल्यानंतर अथवा पतीच्या निधनानंतर चार महिन्यांच्या आत दुसरा विवाह करता कामा नये. दरम्यान,इस्लामाबाद न्यायालयाच्या निकालाला इम्रान खान आणि बुशरा बिबी यांनी आव्हान दिले होते.न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल तपासून इम्रान आणि बुशरा यांना निर्दोष जाहीर केले. जर या दोघांना अन्य प्रकरणात कोठडीत ठेवण्याची गरज नसेल,तर त्यांची सुटका केली जावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.मात्र इम्रान खान यांची सुटका केली जाणार का नाही,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.याआधी इम्रान खान यांना तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणी सुनावलेली शिक्षा रद्द झाली आहे आणि सायफर प्रकरणी त्यांना निर्दोष ठरवले गेले आहे.