नाशिक –
नाशिक शहरातील पंचवटी परिसरात बेकरी प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. इंद्रकुंड भागात ही दुर्घटना घडली असून रिहान उमेश शर्मा (रा. हिमालय हाऊस, इंद्रकुंड, पंचवटी) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंचवटीतील इंद्रकुंड परिसरात राहणार्या शर्मा कुटुंबाचा बेकरीचा व्यवसाय आहे. शर्मा यांच्या राहत्या घरातच एका बाजूला बेकरीचे सर्व साहित्य व व्यवसाय आहे. या ठिकाणी रिहान गुरुवारी (दि.25) रात्री 9 वाजेच्या सुमारास खेळत होता. त्यावेळी बेकरी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी गिरणी (ग्रँडर) बंद होती. रिहान खेळता-खेळता तोल जाऊन गिरणीत पडला. तितक्यात गिरणी चालू झाल्याने तो गिरणीतील पात्यांसह बेल्टमध्ये अडकल्याने कोवळया हाडांचा चेंदामेंदा झाला होता. रिहान गंभीर जखमी झाला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची अनेक हाडे फॅक्चर असल्याचे समोर आले डॉक्टरांकडून त्याच्यावर औषधोपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला. अंतर्गत रक्तस्त्राव होऊन सर्व हाडे मोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची नोंद डॉक्टरांनी केली आहे.