बेंगळुरू
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. याचवेळी बेंगळुरू शहरातील नाल्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. लोकेश (३२) असे या तरुणाचे नाव आहे. लोकेशने नाल्याची खोली मोजण्याचा प्रयत्न केला असता चुकून त्याचा पाय घसरला असे स्थानिकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळापासून सुमारे ५ किलोमीटरच्या अंतरावर त्याचा मृतदेह सापडला.
केंपापुरा अग्रहारा परिसरातील नाल्यात लोकेशचा पाय घसरला आणि तो नाल्यात पडला. नाल्यातील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह म्हैसूर रोडवर ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्याटारायनापुरा येथे सापडला. या प्रकरणी केंपापुरा अग्रहारा पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्यात आली.