बडोदा – भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरील गोरवा-महुनगर उड्डाण पुलाच्या वरून जाणाऱ्या महत्वाकांक्षी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हा पूल अभियांत्रिकीचा हा एक उत्तम नमुना मानला जात आहे. अत्यंत बारकाईने आराखडा तयार करून कुशल कामगारांच्या साह्याने अवघ्या दहा दिवसांत हा पूल उभारण्यात आला आहे.बडोदा बुलेट ट्रेन स्टेशनपासून हा पूल सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. हा पूल उभारण्यासाठी या मार्गावर दहा दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या दहा दिवसांच्या कालावधीत पुलाच्या उभारणीचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.या पुलाची लांबी ४० मीटर आहे. अठरा फूट उंचीवर हा पूल उभारण्यात आला आहे. पुलाचे वजन तब्बल १ हजार ७८ मेट्रीक टन एवढे आहे. उड्डाण पूल आणि हा बुलेट ट्रेनचा पूल यांत ८.७ मीटर अंतर आहे.पुलाची उभारणी करताना अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले होते. सुरक्षेचे सर्व उपाय योजताना नियमित वाहतुकीला फार अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. त्यामुळे हा पूल बुलेट ट्रेन प्रकल्पातील मोठे यश मानले जात आहे.