बुलढाणा – शेगाव येथील अनेक गावांतील ग्रामस्थांना मागील काही दिवसांपासून केस गळतीचा त्रास सुरु झाला. अद्याप त्यामागील कारण आरोग्य विभागाकडून स्पष्ट झाले नाही. मात्र आता या परिसरातील नागरिक दृष्टीदोष होत असल्याची तक्रार उपस्थित करत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या अनेक गावांमध्ये आधी डोक्याला खाज सुटणे, त्यानंतर केस गळून हातात येणे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडणे, यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. यामध्ये युवक वर्गापासून ते वृद्धापर्यंत सर्वांचे केस गळू लागल्याने या गावातील लोकांची समस्या राष्ट्रीय समस्या ठरली होती. या परिसरातील लोकांना बुरशीजन्य संसर्ग झाला नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. यावेळी आयसीएमआरच्या पथकाने गावात दाखल होऊन याठिकाणी तपासणी केल. मात्र, या केसगळतीचे ठोस कारण स्पष्ट झाले नाही. त्यानंतर बोंडगावातील ग्रामस्थांच्या डोक्यावर एका औषधाने केस उगवले आहेत. परंतु, आता त्यांना दृष्टीदोषाची नवीन समस्या सुरु झाली आहे. ज्या लोकांना केसगळतीमुळे टक्कल पडले होते. त्यांना डोळ्यांचा त्रास सुरू झाला असून, काही ग्रामस्थांची दृष्टी कमजोर झाल्याची तक्रार आहे. त्यामुळे केस गळतीनंतर या समस्येवर निदान शोधण्याची गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.
बुलढाण्यातील ग्रामस्थांना केसगळतीनंतर दृष्टीदोषाचा त्रास
