बुलडाणा- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच शिंदे गटात बंडाचे पहिले निशाण फडकले आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे शिंदे गटाच्या नेत्या प्रेमलता सोनावणे यांनी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले.
बुलडाण्यातून शिंदे गटाचे संजय गायकवाड यांना उमेदवारी मिळाली. त्यावरुन आक्रमक झालेल्या प्रेमलता सोनवणे यांनी सांगितले की, बुलडाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. त्यामुळे बुलडाणा मतदारसंघ हा शिंदे गटाने महिलांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी आमची होती. मात्र पक्षाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे मी बुलडाणा मतदारसंघातून स्वतंत्र लढणार आहे.
डबल ग्रॅज्युएट असलेल्या प्रेमलता सोनवणे या उच्चशिक्षित असून राज्यात दारूबंदीसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. 2012 साली नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान त्यांचे मुंडन आंदोलन राज्यभरात गाजले होते. दलित, आदिवासी, अत्याचार पीडित लोकांना प्रेमलता सोनवणे यांनी आपल्या अस्तित्व संघटनेमार्फत मोठा दिलासा दिला आहे.