ठाणे – ठाणे महापालिका आपल्या स्वतःच्या पाणी योजनेमधील मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेणार आहे. तरी या कामामुळे ठाण्यातील काही भागांत बुधवार १५ मार्च रोजी २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
ठाणे येथील माजीवडा येथील लोढा धाम भागातील भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस असलेली महापालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील दोन हजार मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. हे काम बुधवारी हाती घेण्यात येणार असून यामुळे ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील माजीवडा, घोडबंदररोड,पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिद्धेश्वर, समतानगर,
इंदिरानगर,लोकमान्यनगर,श्रीनगर,रामनगर,इटर्निटी, जॉन्सन,साकेत,रुस्तमजी वसाहत परिसर, कळव्याच्या आणि मुंब्र्याच्या काही भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.