बीड एसआयटीत वाल्मिक कराडचे मित्र! फोटो दाखवून विरोधकांचा गंभीर आरोप

मुंबई – मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीमध्ये प्रमुख संशयित वाल्मिक कराडच्या जवळचेच पोलीस अधिकारी असल्याचा आरोप आज विरोधी पक्षातील नेत्यांनी केला. या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एसआयटीतील अधिकारी महेश विघ्ने व वाल्मिक कराडचे एकत्र फोटो प्रसिद्ध केले आहेत. तर खासदार बजरंग सोनवणे यांनीही कराडच्या अधिकार्‍यांशी असलेल्या संबंधांमुळे एसआयटीच्या तपासाबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे मित्र असलेले पोलीस अधिकारी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आमदार आव्हाड यांनी फोटोसह केलेल्या आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटीमध्ये प्रमुख अधिकारी आयपीएसबाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक पोलीस निरीक्षक महेश विघ्ने पहा. हा त्याचा धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन् प्रेमाचे संबंध आहेत. याच विघ्ने याने निवडणूक काळात धनंजय मुंडेचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेले 10 वर्षे तो बीड लोकल क्राईम ब्रँचमध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करत आहे. हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील?
खासदार बजरंग सोनवणे यांनीही एसआयटीतील अधिकार्‍यांचे आणि वाल्मिक कराड याचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ही एसआयटी स्थापन झाली तेव्हाच यात आरोपीशी संबंधित अधिकारी आहेत, ते बदलायला हवेत, असे मी सांगितले होते. विधानसभा निकाल लागला, त्यादिवशी महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांनी एकत्र विजयाचा आनंद साजरा केला होता. महेश विघ्ने आरोपीचा मित्रच तपास करणार असेल, तर किती चांगल्या पद्धतीने चौकशी केली जाईल, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
तर ठाकरे गटाचे आ. अंबादास दानवे म्हणाले की, बीड एसआयटीची यादी त्यांनीच दिली आणि त्यांचेच लोक निवडले आहेत. बीडमध्ये कोणताही अधिकारी सक्षम व निष्पक्ष काम करू शकत नाही. कारण सातत्याने त्याच्यावर राजकीय दबाव असतो.
दरम्यान, एसआयटीवरून सरकारवर शिंतोडे उडवले जात असतानाच आज बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार पोलिसांच्या बदल्या केल्या. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. ते केज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब यांना नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे.

आरोपींचे गुजरात कनेक्शन
संतोष देशमुख हत्या प्रकरणात काल अटक करण्यात आलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हत्येनंतर गुजरातला पळून गेले होते, असे पोलीस चौकशीतून कळले आहे. गुजरातमध्ये काही दिवस राहिल्यानंतर पैसे संपल्याने त्यांनी आधी मुंबई गाठली. नंतर ते पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी पैशासाठी एका परिचिताला कॉल केला. या कॉल लोकेशनवरून त्याला पोलिसांनी अटक केली. गुजरातमध्ये या दोघांनी नेमका आश्रय कुठे घेतला, याची चौकशी आता पोलीस करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top