बीड – मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असताना अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला माजी सरपंचाने खंडणीची मागणी करत धमकी दिली आहे.
सरपंच मंगल मामडगे यांना माजी सरपंच वसंत शिंदे यांनी १ लाखाची खंडणी मागितली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सरपंच मंगल मामडगे यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात वसंत शिंदे, अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुखांविरोधात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिघांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला.
सरपंच मंगल मामडगे म्हणल्या की, शाळेच्या कामासाठी चार लाखांचा निधी आला. त्यातील एक लाख रुपये द्या, अशी मागणी माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख, ज्ञानोबा देशमुख यांनी केली. पैसे दिले तरच तुला काम करू देणार, नाहीतर काम करू देणार नाही अशी धमकी दिली. ११ जानेवारीला माझ्या मुलाला वसंत शिंदे यानी घरी बोलावले. तुझ्या आईला सांग, अर्धवट कामांवर सह्या करा, नाहीतर तुझ्या आईला जेलमध्ये टाकू आणि तुझी आई कशी जगते ते बघू, असे त्याला धमकवले. माझ्या मुलाने घरी येऊन मला याबाबत सागितले. त्यानंतर माझ्या मुलाने यांना कंटाळून आत्महत्या केली. मला कुठल्याही परिस्थितीत न्याय द्या, नाहीतर मी आत्मदहन करेन.