बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले असताना बीडमधील आणखी एक सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू औष्णिक केंद्राची राखेची वाहतूक करणार्या वाहनाच्या धडकेत झाला असल्याने हा अपघात नसून घातपात आहे, अशी चर्चा होत आहे. आ. सुरेश धस यांनीही या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे.
सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेतातून घरी परतत होते. त्यावेळी परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर काल रात्री अपघात झाला. औष्णिक केंद्राची राखेची वाहतूक करणार्या टिप्परने क्षीरसागर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सरपंच अभिमून्य क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर सदर अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चुराडा झाला. या अपघातासंदर्भात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून टिप्पर ताब्यात घेतला. परंतु टिप्परचालक पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे.
अभिमन्यू क्षीरसागर यांचे कोणाशीही वैर नव्हते. ते सर्वांशी मिळून मिसळून वागणारे सरपंच होते. त्यामुळे यात कुठलाही घातपात झाल्याचा कुठलाही संशय आम्हाला नसल्याचे ग्रामस्थ व नातेवाईकांनी म्हटले असले तरी बीडमधील सध्याच्या परिस्थितीमुळे या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या अपघातावर प्रतिक्रिया देताना आमदार सुरेश धस म्हणाले की, बोगस आणि अवैध राखेची लूट सुरू असून, तिची वाहतूक करणार्या टीप्परकडून सौंदाना गावच्या दलित समाजाच्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेला आहे. हा घातपात आहे की, अपघात याचा तपास व्हायचा आहे. पण, राज्यात एवढी भयानक चर्चा सुरू असूनही, यांचे राखेचे टीप्पर बंद नाहीत. ते सुरूच आहेत. याला परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी जबाबदार आहेत. सरकारने पावले उचलावी. वाळू माफिया, राख माफिया, स्क्रॅप, गुटखा माफियांवर मोकाअंतर्गत कारवाई, हेच या प्रश्नाचे उत्तर आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्येला एक महिना उलटला आहे, तरीही या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात आरोपींसह एका फरार आरोपीवर कालच मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, प्रमुख संशयित आणि बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला मोक्का लावलेला नाही. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू असलेल्या वाल्मिक कराडवर केवळ खंडणीच्या गुन्ह्याखाली खटला चालणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण खंडणी प्रकरणाशी संबंधित असल्याचाही आरोप होत आहे. यात बीडमध्ये औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या राखेचाही मुद्दा चर्चेत आला आहे. या राखेच्या विक्रीचा कोट्यवधी रुपयांचा व्यवहार राख माफियांकडून होतो. या राखेची वाहतूक करणार्या वाहनांना अनेकदा नंबर प्लेटच नसते, असाही आरोप आहे. त्याच राखेची वाहतूक करणार्या वाहनाने सरपंचाला उडवल्याने या अपघाताबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
बीडमध्ये आणखी एका सरपंचाचा संशयास्पद मृत्यू
