पाटणा – बिहारमधील सारण, सिवन व छप्रा जिल्ह्यात विषारी दारुचे सेवन केल्याने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. काल विषारी दारुमुळे १५ जणांचा मृत्यू झाला होता. काही जण अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत.
बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने काही वर्षांपासून दारुबंदी केली आहे. तरीही राज्यात अवैध दारुचा सुळसुळाट आहे. काल सकाळी मगहर व औरिया या गावात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने तिथे धाव घेत या मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला असता त्यांचे मृत्यू विषारी दारुच्या सेवनाने झाल्याचे स्पष्ट झाले. प्रशासन सतर्क झाल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याचे आढळले. इब्राहिमपूर गावात ७ जणांचा मृत्यू झाला. या विषारी दारुचा परिणाम तब्बल १२ जिल्ह्यांत झाला आहे. दारुबंदी नियमांतर्गत कारवाईच्या भितीने गावकऱ्यांनी अनेकांचे अंत्यसंस्कार परस्पर उरकल्यामुळे नेमके किती मृत्यू झाले, हे अजून समजलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई सुरु केली असून मगहर व औरिया तालुक्यातील दोन सुरक्षा अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पोलिसांवरही कारवाई सुरु केली आहे.