नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री व हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जितन राम मांझी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी २० जागांची मागणी केली आहे. झारखंड व दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांच्या पक्षाला एकही जागा न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याने एनडीएमध्ये आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
बिहारच्या विधानसभा निवडणुका २०२७ साली ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे. हिंदुस्थानी आवाम मोर्चा च्या वाढत्या महत्वाकांक्षेवर आता बिहारमधील दोन प्रमुख घटक भाजपा व जनता दल संयुक्तपणे काय तोडगा काढतात ते पाहावे लागणार आहे. मांझी यांनी याआधीच बिहारमध्ये आपल्या पक्षाची ताकद दाखवून देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ते २८ फेब्रुवारी रोजी पाटणाच्या गांधी मैदानावर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेणार आहेत.
या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले की, मांझी यांनी आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे की त्यांना गोडसेवादी पक्षाबरोबर राहायचे आहे की आंबेडकर वादी. राजदच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, मांझी भाजपाबरोबर गेल्यापासून दलितांच्या विकासासाठी काहीही बोलू शकत नाहीत. त्यामुळे आता बिहारचा दलित समाज त्यांच्या बाजूने राहणार नाही. जनता दल संयुक्तचे नेते निरज कुमार यांनी म्हटले आहे की एनडीए चे सर्व नेते हे एकत्र असून मांझी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री आहेत. येत्या काही दिवसात एनडीएचे सर्व नेते बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात एकत्र बसून चर्चा करतील.