मुंबई – राज्याच्या राजकारणात सध्या सातत्याने चर्चेत राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज एका नव्या वृत्तामुळे चर्चेत आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौर्यादरम्यान अजित पवार यांनी बिहार पॅटर्न राबवून मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी अमित शहा यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. हे वृत्त अजित पवार आणि तटकरे या दोघांनी फेटाळले असले तरी हे घडू शकते असे मानणारे अनेकजण आहेत.
अमित शहा 8 आणि 9 सप्टेंबर असे दोन दिवस मुंबई दौर्यावर आले होते. 8 सप्टेंबर रोजी त्यांनी भाजपाच्या पदाधिकार्यांच्या बैठका घेतल्या. तर दुसर्या दिवशी त्यांनी लालबागचा राजासह मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. दिवसभरातील शहा यांच्या या सर्व कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे सावलीसारखे त्यांच्यासोबत दिसले. मात्र अजित पवार कुठेही दिसले नाहीत. दुपारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शहा यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला शिंदे, फडणवीस यांच्यासह अजित पवार उपस्थित होते असे सांगण्यात आले.
अमित शहा यांच्या या मुंबई दौर्यादरम्यान अजित पवार यांनी त्यांच्यासमोर आपल्याला मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे. या वृत्तावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सर्वात पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या वृत्तात काही तथ्य असेल असे वाटत नाही. निवडणुकीपूर्वी अजित पवार अशी काही मागणी भाजपाकडे करतील असे वाटत नाही. कोणीतरी खोटी बातमी पसरवली असेल.
अजित पवार यांनी तर हे वृत्त साफ फेटाळून लावले. ‘या सर्व निव्वळ थापा आहेत. अमित शहा काल मुंबईत होते. त्यामुळे त्यांची मी जरूर भेट घेतली. पण भेटीत अशी काहीही चर्चा झाली नाही. विधानसभेच्या सर्व 288 जागा महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. जागावाटपाचा निर्णय सर्व घटक पक्ष एकत्रपणे घेतील, असे अजित पवार यांनी सांगितले.
मात्र बिहार राज्यात नितिशकुमार यांनी भाजपाशी युती करताना ज्याप्रमाणे मुख्यमंत्रिपद मागून घेतले त्याप्रमाणे भाजपाशी युती करताना अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा वादा केला होता का? हा प्रश्न उपस्थित होतो. अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळी फक्त उपमुख्यमंत्रिपदाचा वादा घेऊन त्यांनी इतके मोठे राजकीय पाऊल उचलले असेल असे वाटत नाही.
बिहार पॅटर्न राबवा मला मुख्यमंत्री करा! अजित पवारांची अमित शहांकडे मागणी?
