पाटणा – राजकीय धक्के देण्यात प्रसिद्ध असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रीमंडळातील एका सहकाऱ्याला ऑटोरिक्षाने धडक मारली असून त्यात त्यांचे चार अंगरक्षकही जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बिहार सरकारमधील सहकार मंत्री रत्नेश सादा हे आज सकाळी आपल्या बलिया सिमर या गावी होते. आज पहाटे पाच वाजता ते चालायला गेले असता त्यांना एका ऑटोरिक्षाने धडक मारली. यामध्ये मंत्र्यांसह त्यांचे चारही अंगरक्षक जखमी झाले. मंत्री रत्नेश सादा यांच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे. त्यानंतर या पाचही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. मंत्र्यांचे त्यानंतर सीटीस्कॅनही करण्यात आले असले तरी जिल्हा शल्यचिकित्सकांनी ही दुखापत साधारण असल्याचे म्हटले आहे.