नवी दिल्ली – बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बिल्किस बानो प्रकरणात सुटका झालेला एक दोषी घरी नसल्याने त्याला अद्याप न्यायलायाकडून नोटीस मिळालेली नाही. न्यायालयाने यासंदर्भात दोन गुजराती वृत्तपत्रांमधून जाहीर नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. दोषींनी न्यायालयीन कारवाईत सहभागी न झाल्यास पूर्वलक्ष्यी प्रभाावाने कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.
बिल्किस बानो प्रकरणी एका दोषीला न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली नाही. तो घरी नसून त्याचा फोनही बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने वृत्तपत्रात सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २७ मार्च रोजी बिल्किसच्या दोषींच्या मुदतपूर्व सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दोषींना नोटीस बजावली होती. मात्र, ११ पैकी एका दोषीला अद्याप नोटीस बजावण्यात आलेली नाही. यावेळी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ याबाबत टिपणी करताना म्हणाले की, एक व्यक्ती संपूर्ण न्यायालयीन कामकाज ठप्प करत आहे.
बिल्किस बानो प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलैला
