कराड – यापुढे वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना २५ लाखाची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना ५ लाखाची मदत दिली जाईल. याबाबतचा सरकारने निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून शहरी भागातील लोकवस्तीपासून ते ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यांपर्यंत वाघ व बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात कराड व पाटण वनक्षेत्रालगत अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
या हल्ल्यातील गंभीर जखमींना ५ लाखांची मदत, तर मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय अशा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावलंही उचलली जाणार आहेत. यापूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दिली जाणारी आर्थिक मदत ही तोकडी होती. जर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना २० लाखाची मदत दिली जात होती. तर गंभीर जखमी झालेल्याला १ लाख २५ हजार मदतीची तरतूद होती. ही रक्कम अधिक तोकडी होती. त्यात वाढ केली जावी अशी मागणी होत होती. सतत होणाऱ्या या मागणीमुळे आता शासनाने हा निर्णय घेतला आहे. ही मदत राज्यातील अन्य जिल्ह्यांनाही लागू होणार आहे. ही मदतीची रक्कम देताना १० लाख धनादेशाद्वारे तर उर्वरित रक्कम मुदत ठेव स्वरुपात मृताच्या वारसाला दिली जाते. त्यासाठी हल्ला झाल्यानंतर १९२६ या वन विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधता येतो.