आंबेगाव – भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढल्याने धोका निर्माण झाला असून या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कारखान्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंबेगाव, शिरुर या परिसरात सध्या बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे ते भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीतही येत आहेत. या बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी शासनातर्फे बिबट्यांची नसबंदी करणे आवश्यक आहे. यासाठी एड. तेजस देशमुख यांच्यातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. बिबट्याच्या नसबंदीचे निर्देश सरकारला देण्यात यावेत अशी मागणी यात करण्यात आली आहे.