‘बिजामंडल मशीद’ ही मंदिर आहे विजय सूर्यमंदिरचा वाद पेटला

भोपाळ – मध्य प्रदेशमध्ये भोजशाला ही मंदिर आहे की मशीद हा वाद कोर्टात पोहोचला असताना आता मध्य प्रदेशातच बिजामंडल मशीद ही मुळात विजय
सूर्यमंदिर आहे. हा जुना वाद आज नागपंचमी दिवशी उफाळून आला. प्रसिद्ध सांची स्तुपांपासून दहा किलोमीटर अंतरावर ही मशीद आहे. मात्र हे मंदिर असल्याचा दावा गेले अनेक वर्षे सुरू आहे.
या वादावर तोडगा म्हणून वर्षातून एकदा नागपंचमीच्या दिवशी येथील दरवाजा उघडून या मंदिराबाहेर पूजा करण्यासाठी हिंदुंना परवानगी दिली जाते. मात्र यावर्षी भक्तांनी बाहेर पूजा न करता मंदिराच्या आत जाऊन पूजा करण्याची परवानगी मागितली. जिल्हाधिकार्‍यांनी हिंदुंना ही परवानगी नाकारली. कारण पुरातत्त्व खात्याकडे इथे मंदिर असल्याची नोंद नसून बिजामंडल मशीद असल्याची नोंद आहे. आत प्रवेशाला परवानगी नाकारल्याने मंदिर की मशीद हा कित्येक वर्षे जुना वाद आज पुन्हा उफाळून
आला आहे.
मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील ही मशीद आहे. भोपाळपासून 60 किलोमीटर अंतरावर तर सांची स्तुपापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेली ही मशीद 11 व्या ते 12 व्या शतकात बांधण्यात आली अशा इतिहासात नोंदी आहेत. मात्र इथे मुळात विजय सूर्यमंदिर होते जे पुढे मोगलांच्या आणि विशेषतः औरंगजेबाच्या राजवटीत तोडून त्याजागी मशीद बांधण्यात आली असा दावा आहे. मोगलांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी मशीद उद्ध्वस्त केली. तेव्हापासून हे प्रार्थनास्थळ भग्नावस्थेत आहे. 1934 साली काही कारणाने हा मुद्दा चर्चेत आला. हिंदू महासभेच्या वतीने मंदिर असल्याचा दावा करीत मोठे आंदोलन छेडण्यात आले. तेव्हापासून हे मंदिर वर्षातून एक दिवस नागपंचमीनिमित्त हिंदू भाविकांसाठी उघडण्याचा पायंडा पडला. मात्र त्यानंतर अधूनमधून ‘मंदिर की मशीद’ असा वाद येथे डोके वर काढत होता. सन 1965 मध्ये या वादामुळे हिंदू-मुस्लीम यांच्यातील तणाव प्रचंड वाढला. त्यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री द्वारका प्रसाद मिश्रा यांच्या आदेशाने मुस्लीम बांधवांसाठी स्वतंत्र मशीद बांधून देण्यात आली.
तरीही पुरातत्त्व विभागाच्या विविध राज्यांमधील कार्यालयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने नोंदीमध्ये त्रुटी राहिल्या आहेत. पुरातत्त्व विभागाच्या केंद्रीय कार्यालयात या वास्तुची नोंद बिजामंडल मशीद असा आहे. तर मध्य प्रदेश विभागीय कार्यालयात विजय सूर्य मंडल अशी नोंद आहे. त्यामुळे घोळ झाला आहे.
आज नागपंचमीच्या दिवशी जिल्हाधिकार्‍यांनी हिंदुंना मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी नाकारली. हे वादग्रस्त प्रार्थनास्थळ भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे आणि पुरातत्त्व विभागाकडे याची बिजामंडल मशीद अशी नोंद आहे, असे कारण देत जिल्हाधिकार्‍याने परवानगी नाकारली. त्यामुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top