बाहेरच्यांना उमेदवारी कशी देता? मुनगंटीवारांचा शहांनाच सवाल

नागपूर- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात किशोर जोरगेवार यांच्या उमेदवारीवरून भाजपामध्ये मोठा वादंग उठला आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात कधीही उघड भूमिका न घेणारे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या उमेदवारीला उघड विरोध करीत निवडीवर अंतिम निर्णय घेणारे केंद्रिय नेतृत्व अमित शहा यांनाच सवाल केला की तुम्ही बाहेरून चार पक्ष फिरून आलेल्याला उमेदवारी कशी देता? जोरगेवार यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी करण्यासाठी ते आजच दिल्लीला रवाना झाले. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांसमोर उघड उघड नाराजी व्यक्त करीत भाजपा नेतृत्वालाच सवाल केले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की किशोर जोरगेवार यांनी मागील पाच वर्षांत अनेकदा पक्ष बदलले आहेत. अशा व्यक्तीला उमेदवारी देणे योग्य नाही. एखाद्या मतदारसंघात पक्षसंघटना कमकुवत असेल तर बाहेरून उमेदवार आणणे एकवेळ ठिक म्हणता येते. पण चंद्रपूरमध्ये तशी स्थिती नाही. येथे पक्ष संघटना बळकट आहे. बृजभूषण पाझारे यांच्यासारखे तगडे उमेदवार आहेत. त्यांना डावलून जोरगेवार यांना उमेदवारी दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनावर प्रतिकूल परिणाम होईल. पाच वर्षे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी, पक्षाचा विस्तार करण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे परिश्रम केले. त्यांचा विश्वासघात करणे योग्य नाही. बाहेरच्यांना उमेदवारी दिली तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते की, त्यांचा सतरंजी उचलण्यासाठी केवळ वापर करून घेतला. पाच वर्षे राबवून घेतात आणि किंमत देत नाहीत. असे घडले तर पुढे कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवणे जड जाईल. संघटना मजबूत ठेवणे अवघड जाईल. भविष्यात पक्षाला त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
बृजभूषण जोरगेवार हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. 2014 मध्ये त्यांनी तेव्हाच्या एकसंध शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. 2019 मध्ये ते अपक्ष लढले आणि विजयी झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदे गटाची साथ सोडली. महाविकास आघाडीतून शरद पवार गटातून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. 23 ऑक्टोबरला ते शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र इथे काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणाऱ्याला शरद पवार गटाने उमेदवारी दिली तर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार कोणत्या तोंडाने करणार, असा सवाल करत धानोरकर यांनी जोरगेवार यांना विरोध केला. त्यामुळे त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होऊ शकला नाही. त्यानंतर जोरगेवार यांनी भाजपाकडे मोर्चा वळवला आणि भाजपात प्रवेश करून चंद्रपुरातून उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी मुनगंटीवार यांनी उघडपणे हत्यार उपसले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top