मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा मकाऊ येथील कॅसिनोत जुगार खेळतानाचा एक फोटो एक्स अकाऊंटवर पोस्ट केला. ‘महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत’ असे म्हणत राऊत यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, या कॅसिनोत बावनकुळेंनी 3 तासात साडेतीन कोटी डॉलर जुगारात उधळले! या आरोपाने खळबळ माजताच भाजपने लगेच आदित्य ठाकरे यांचा ग्लासमधून पित असल्याचा फोटो टाकला. इतक्या पातळीवर जाऊन एकमेकांचे खासगी आयुष्य उघड करण्याची ही चढाओढ लागल्याने राजकारणी लोकांतच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
संजय राऊत यांनी एक्स अकाऊंटवरून फोटो पोस्ट करत विचारले की, 19 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता मकाऊमधील कॅसिनोत साधारण 3.50 कोटी जुगारात उडवले, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? त्यानंतर आणखी एक पोस्ट करून राऊत म्हणाले की, ते म्हणे.. कुटुंबासह मकाऊला गेले आहेत जाऊ द्या. त्यांच्याबरोबर बसलेली फॅमिली चिनी आहे का, ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करीत आहेत, त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का, जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय?
संजय राऊत यांच्या आरोपानंतर बावनकुळे यांनी त्वरित खुलासा केला की, मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबियांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. हे स्पष्टीकरण देत यांनी एक्सवर आपल्या कुटुंबासोबतचा बोटीतील फोटो टाकला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी आणखी गौप्यस्फोट करत सांगितले की, माझ्याकडे आणखी 27 फोटो आणि पाच व्हिडिओ आहेत. ते मी टाकले तर भाजपला आपले दुकान बंद करावे लागेल. मी कुणाचे नाव घेतलेले नाही. तो फोटो कुणाचा आहे ते मला ठाऊक नाही. त्यांनी सांगावे, तो मी नव्हेच. मी याबद्दल काही बोलणारही नाही. परंतु भाजपवालेच बोलताहेत की, आमचा माणूस आहे. हे जगातील सगळ्यात मोठा कॅसिनो असलेले मकाऊ येथील पंचतारांकित हॉटेल वेनेशाईन आहे. लोक तिथे कॅसिनोच खेळायला जातात. तिथे आपण कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये असताना कुणीतरी हा फोटो काढल्याचे ते सांगत आहेत. परंतु त्यांच्या आजूबाजूला चिनी लोक दिसत आहेत. म्हणजे त्यांचा चिनी एक्सटेंडेड परिवार होता का? लोक बँकॉकला, स्वित्झर्लंडला फिरायला जातात. यात लपवण्यासारखे काही नाही. आम्हाला कुणाच्या कुटुंबाला डिस्टर्ब करायचे नाही. परंतु आमचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील स्थिती गंभीर आहे. इथे महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना, महाराष्ट्रातील माणूस मकाऊला जाऊन जुगार खेळतो. तेलगीने एका रात्रीत एक कोटी उडवल्याचे ऐकले होते. यांनी मकाऊमध्ये तीन तासांत साडेतीन कोटी डॉलरमध्ये उडवले.
संजय राऊत म्हणाले की, मी कुणाला घाबरत नाही. कुणावर हल्ला करण्याचे आमचे संस्कार नाहीत. सुरुवात तुम्ही केली. आम्ही अंत करू. एवढेच सांगतो की, खुलासे करू नका. जेवढे खुलासे करत जाल तेवढे फसाल. दोन टक्क्यांचे लोक माझ्यावर सोडू नका. माझ्याकडे एकूण 27 फोटो आणि 5 व्हिडिओ आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, ही नाना पटोले यांची मागणी योग्यच आहे.
संजय राऊत यांच्या पोस्टमुळे खळबळ झालेली असताना महाराष्ट्र भाजपाने आदित्य ठाकरे यांचा एका पार्टीतील हातात ग्लास घेऊन पीत असल्याचा फोटो एक्स वर पोस्ट केला. यात म्हटले आहे की, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते तेथील हा परिसर. ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की? या पोस्टमुळे आणखी वातावरण तापले.
या फोटोवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, तिथे एक मोठा फुटबॉलपटू आला होता. तिथे आदित्य ठाकरे गेले आणि तो जो ब्रँड पित होते तो मोदींचाच ब्रँड आहे. मोदी सगळीकडे पितात तोच हा ब्रँड आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत छेडले असता ते म्हणाले की, ते किती डेस्परेट झाले आहेत ते दिसून येते. बावनकुळे सहकुटुंब तिकडे गेले होते. जाणूनबुजून फोटो कापून अर्धवट टाकायची ही विकृत मानसिकता आहे. राजकारणाची पातळी खाली आणण्याचा हा प्रकार आहे. तो बंद व्हायला हवा.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळेंच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. दुसरीकडे, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा फोटो समोर आला आहे. या फोटोचा तपास केला पाहिजे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष कॅसिनोत जुगार खेळत असतील, तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे.
बावनकुळेंचा मकाऊच्या कॅसिनोत जुगार आणि आदित्यच्या हाती व्हिस्कीचा ग्लास
