बार्शी- जवळगाव येथील नागझरी नदीवरील जवळगाव मध्यम प्रकल्प काल पूर्ण क्षमतेने भरला असून सुमारे ३० गावांना याचा फायदा होणार आहे. तर १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. रब्बीसह इतर बागायती पिकांचे खात्रीशीर उत्पादन घेता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.
या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३४.९२ द.ल.घ.मी असून उपयुक्त पाणीसाठा २९.१९ द.ल.घ.मी इतका आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काल सायंकाळपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले.त्यामुळे त्याचा सांडवा सुटला आहे. मागील वर्षी २०२३ मध्ये धरण केवळ ३० टक्केच भरले होते.तर २०२१ व २२ मध्ये ते शंभर टक्के भरले होते.जवळगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे कालव्याच्या खाली सुमारे सहा हजार हेक्टर तर उचल पाण्यातून सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.