बार्शीत पुन्हा वाघाचे दर्शन! गावकर्‍यांमध्ये दहशत कायम

बार्शी – यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून तब्बल ५०० किलोमीटर दूर अंतर कापून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आलेला वाघ गुरुवारी पुन्हा दिसला. मात्र दिवसभरात या वाघाने कोणत्याही जनावराची शिकार केलेली नाही.

गेल्या शनिवारी धाराशिव-सोलापूर सीमेवर येडशीजवळ सर्वप्रथम या वाघाचे दर्शन झाले होते. नंतर हा वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात रामलिंग अभयारण्य परिसरातील काही गावांमध्ये दिसला.ढेंबरेवाडीत तलावाच्या काठावर पाणी पिण्यासाठी आलेल्या या वाघाची छबी सापळा कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या चारे गावच्या शिवारातही सापळा कॅमेऱ्यातून वाघाचे दर्शन झाले. गेल्या तीन चार दिवसांत वाघाने काही प्राण्यांची शिकार केल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती.आतापर्यंत या वाघाने एकाही व्यक्तीवर हल्ला केला नसला तरी त्याची मोठी दहशत परिसरातील गावांमध्ये कायम असताना गुरुवारी येडशीपासून बार्शी तालुक्यातील हद्दीत कारी-नारी गावांच्या परिसरात राम नदीजवळ वाघ फिरताना गावकऱ्यांच्या नजरेस पडला.आता वाघाला पकडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी वन खात्याने अद्यापि पावले उचलली नाहीत. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या आदेशाची वाट पाहिली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top