बारावीत नापास झाल्याने ९ विद्यार्थ्यांची आत्महत्या

अमरावती –

आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमिजिएट एक्जामिनेशनचा इयत्ता अकरावी आणि बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. मात्र हा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत तब्बल ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याव्यतिरिक्त आणखी दोन विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुमारे १० लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ६१ टक्के विद्यार्थी हे ११ वीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर ७२ टक्के विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

मलम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिनाधापुरम येथे एका १६ वर्षीय मुलीने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. ती मूळची विशाखापट्टणम जिल्ह्यातील आहे. इंटरमिजिएट फर्स्ट इयरच्या काही विषयात नापास झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. एका १७ वर्षीय मुलाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. विशाखापट्टणममधील कांचरापलेम भागात आणखी एका १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. तो इंटरमिजिएटच्या दुसऱ्या वर्षात एका विषयात नापास झाला होता. इंटरमिजिएट परीक्षेत नापास झाल्याने चित्तूर जिल्ह्यातील दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यातील एका विद्यार्थिनीने तलावात उडी घेतली, तर दुसऱ्या मुलाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली.

भारतातल्या आयआयटीच्या वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये या वर्षात आतापर्यंत चार विद्यार्थ्यांचा आत्महत्या केली. यावर भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top