बारामती – तब्बल २५ वर्षे रखडलेला बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग आता मार्गी लागणार आहे. फलटण-लोणंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून बारामती-फलटण रेल्वे मार्गाचे ७८ टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. येत्या दोन वर्षांत हा रेल्वेमार्ग उभारण्याचे उद्दिष्ट असून या रेल्वे मार्गासाठी प्रत्येकी ३०० कोटी रुपयांच्या दोन अशा ६०० कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
बारामती-फलटण-लोणंद या रेल्वेमार्गाला रेल्वे विभागाने सन १९९७-१९९८ च्या रेल्वे अर्थसंकल्पातच मंजुरी दिली होती. प्रत्यक्षात या रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन सुरू व्हायला २० वर्षांचा काळ निघून गेला. फलटण-लोणंद हे भूसंपादन होऊन तो रेल्वेमार्गही अस्तित्वात आला. बारामती-फलटण हे भूसंपादन रखडले होते. आता मात्र रेल्वेच्या नियमानुसार बऱ्यापैकी भूसंपादन संपलेले असून, उर्वरित भूसंपादन वेगाने करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंत १७७ पैकी १३९ हेक्टर खासगी भूक्षेत्र संपादित केले आहे. तर उर्वरित ३८ हेक्टर जागेची निवाडा प्रक्रिया सुरू आहे. या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी रेल्वेकडून २३८ कोटी रूपये महसुल विभागाला प्राप्त झाले असून २०५ कोटींच्या निधीचे वाटपही झाले आहे.