पुणे – बारामतीतील गोविंदबाग येथील पवार कुटुंबाचा दरवर्षी होणारा दिवाळी पाडव्याचा स्नेहमिलन कार्यक्रम आख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे भेटायला आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा एकत्र स्वीकारायचे. मात्र, अनेक वर्षांपासूनची पवार कुटुंबाची ही कौटुंबिक प्रथा यावर्षीही राजकारणामुळे खंडीत होणार आहे. यंदा दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार गोविंदबागेत उपस्थित राहणार नसून ते पाडवा काटेवाडीत साजरा करणार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाचा पाडवा दोन ठिकाणी यावर्षी साजरा होणार आहे.
अजित पवार हे सुप्रिया सुळे यांना भाऊबीजेसाठीही भेटणार नाहीत. राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे कौटुंबिक एकजुटीचा जाहीर अभिमान बाळगणार्या या कुटुंबातही कायमची फूट पडली आहे.
पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या वर्षी फूट पडली. या फुटीनंतरची ही दुसरी दिवाळी आहे. दरवर्षी दिवाळी पाडव्याचा सण पवार कुटुंब बारामतीकरांबरोबर एकत्र साजरा करते. या दिवशी बारामतीतील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत पवार कुटुंबाला दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी हितचिंतक आणि सर्वसामान्य बारामतीकर यांची गर्दी होते. सत्ता असो वा नसो, शरद पवार आणि कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे, त्यांची भेट घेणे, त्यांचा आशीर्वाद घेणे ही अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यासाठी सर्व पवार कुटुंब एकत्र येते. यंदा मात्र गोविंदबागेत वेगळे चित्र दिसणार आहे. या कौटुंबिक स्नेहसोहळ्यात अजित पवार अधिकृतरित्या दिसणार नाहीत. एवढेच नव्हे तर ते काटेवाडीतील आपल्या निवासस्थानी स्वतंत्र पाडवा साजरा करून लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सध्या बारामतीच्या दौर्यावर असणारे अजित पवार यांनीच आज हे जाहीरपणे सांगितले आहे. ते म्हणाले की, दिवाळीच्या दोन-तीन सुट्ट्या आहेत. उद्या मी काटेवाडीत लोकांना भेटणार आहे. काही बाहेरचे लोक आणि पक्षातील सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदि भेटणार आहेत. सहयोगला एवढ्या लोकांची व्यवस्था होणार नाही. या प्रकारे पुढील वाटचाल होणार आहे. दिवाळी पाडव्यासंदर्भात अजित पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत पहाटे साडेसहा वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. बारामतीकरांनो, सालाबादप्रमाणे यंदाचा हा दिवाळी सण एकत्र येऊन आपण सगळे साजरा करूया. दीपावली पाडव्यानिमित्त काटेवाडी येथील माझ्या निवासस्थानी मी तुमचे स्वागत करतो. चला, बंधुभाव जपूया, असे अजित पवारांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे.
तर पाडव्याच्या आदल्या दिवशी आजही गोविंदबागेत दिवाळीनिमित्त खूप मोठी गर्दी होती. पाडव्याला खूप गर्दी होत असल्याने अनेक कार्यकर्ते आजच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शरद पवारांना भेटायला आले होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवारसाहेबांवर प्रेम करणारे हजारो लोक आज आले होते. उद्याही येतील. हा एक असा दिवस असतो ज्या दिवशी आम्ही सगळ्यांची आतुरतेने, प्रेमाने वाट पाहत असतो. लोक आदरणीय पवारसाहेबांना भेटायला येतात. आमच्यासाठी हा सर्वात आनंदी आणि महत्त्वाचा दिवस असतो.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही बारामती मतदारसंघात पवार कुटुंबातच लढत होणार आहे. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा युगेंद्र पवार एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक पवार कुटुंबातील कटुता आणखी वाढवेल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार सध्या बारामतीत ठाण मांडून आहेत. 3 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीचे तीन दिवस ते संपूर्ण बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. आज त्यांनी 50 हून अधिक गावांना भेटी दिल्या. त्यानंतर ते म्हणाले की, काहींनी ठरवले होते की, लोकसभेला ताईंना निवडून द्यायचे आणि विधानसभेला दादाला. त्याबद्दल जास्त बोलणार नाही. परंतु मागच्या वेळी पहिल्या नंबरच्या मताधिक्क्याने पाठवले. त्यामुळे मी पहिल्या नंबरचा निधी आणला. बारामतीत 9 हजार कोटी निधी देण्याचे काम केले. यावेळीही विधानसभेत चांगल्या मताधिक्क्याने संधी द्या.
गेल्या वर्षी डेंग्यू, यावर्षी फूट
गेल्या वर्षीही अजित पवार गोविंद बागेतील पाडव्याच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी सावरण्याचा प्रयत्न करीत उत्तर दिले होते की, अजितदादांना डेंग्यू झाला असल्याने डॉक्टरांनी त्यांना 21 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र नंतर उघड झाले की, त्याच्या आदल्याच दिवशी अजित पवार यांनी शरद पवार यांची गुपचूप भेट घेतली होती. तेव्हाच फुटीच्या चर्चेला आणखी जोर आला होता. यावर्षी मात्र कोणतीही लपवाछपवी न करता फूट पडल्याचे दोघा पवार नेत्यांकडून उघड झाले आहे.