बारसूसाठी मोदींनी सौदीशी केला सौदा

नवी दिल्ली – स्थानिकांच्या विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या कोकणातील बारसू रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला आता वेग येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात काल या प्रकल्पासंदर्भात सहमती झाली. सुमारे 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे. काल सौदीचे युवराज आणि सत्ताधीश मोहम्मद बिन सलमान भारताच्या एक दिवसाच्या दौर्‍यावर आले होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांची भेट घेतली होती. मोदी आणि सौदीचे युवराज यांच्या या बैठकीत बारसू प्रकल्पाबाबत तसेच हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षांत सौदी अरेबिया भारतात 8.20 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक करताना पुढील काम योग्य पद्धतीने चालण्यासाठी दोन्ही देशांच्या संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करण्यावर या भेटीत एकमत झाले.
कोकणातील राजापूर तालुक्यातील सोलगाव परिसरात ’क्रूड ऑइल रिफायनिंग’चा हा प्रकल्प होणार आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील ’आरामको’ या सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणार्‍या कंपनीसोबत केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 13 हजार एकर जागेत हा प्रस्तावित आहे.
बारसू प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील जैवविविधता आणि पर्यावरणाची हानी होणार आहे. मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होणार आहे आंबा, मत्स्य व्यवसाय, शेती हे सगळेच या प्रकल्पामुळे नष्ट होणार असल्याने स्थानिकांचे व्यवसाय बुडणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्यात बारसू परिसरातील ग्रामस्थांनी सरकार विरोधात मोठे आंदोलन केले होते. हे आंदोलन दडपून सरकारने माती परीक्षण केले होते. मात्र, स्थानिकांचा विरोध कायम असूनही सरकारने हा प्रकल्प पुढे रेटण्याचा निर्णय घेतला असून मोदी आणि सौदी युवराजांच्या झालेल्या बैठकीमुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले गेले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, जी-20 साठी आलेले परदेशी पाहुणे उगाच आले नव्हते. प्रत्येकाला आपल्या देशातून काही ना काही देण्याचे आमिष दाखवण्यात आले, म्हणून ते आले. मग ते जो बायडन असोत किंवा सौदीचे राजपुत्र असोत. मग एखादा करार असेल किंवा आणखी काही असेल. प्रत्येक जण आपल्याकडून काहीतरी ओरबडायला आला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top