रत्नागिरी – बारसूच्या सड्यावर रिफायनरी प्रकल्पविरोधक संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरू होते. त्याचवेळी रिफायनरीचे माती सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू होते. या आंदोलनाविषयी उद्योगमंत्री उदय सामंतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सकाळी भेट घेतली. तसेच शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत फोनवरुन देखील चर्चा केली. बारसू प्रकल्पामध्ये शरद पवार आता मध्यस्थी करणार का, अशी चर्चा एकाबाजूला सुरू होती तर दुसरीकडे ठाकरे गटाला राजकीय शह देण्यासाठी शिंदे गट हा खटाटोप करत असल्याची चर्चा रंगली होती. दुसरीकडे आंदोलनास्थळी जाणारे स्थानिक खासदार विनायक राऊतांचा गाड्या ताफा पोलिसांनी अडवल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी आंदोलकांची भेट घेतली.
आंदोलकांचे प्रश्न समजून घेऊन चर्चेतून सरकारने तोडगा काढावा, अशी पवारांची भूमिका आहे. पवारांच्या भेटीची माहिती देताना उदय सामंत म्हणाले की,‘ही राजकीय बैठक नव्हती. बारसूमधील सध्याची परिस्थिती काय आहे. त्याची माहिती मी शरद पवारांना दिली. शेतकऱ्यांशी शासन चर्चा करायला तयार आहे. जिल्हा प्रशासनाने तिथल्या 300 ते 350 लोकांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन पुढील हालचाली केल्या जातील.`
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी रोखल्याने काही काळ गोंधळ उडाला. पण त्यानंतर राऊत आंदोलनस्थळी पोहोचले आणि आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर राऊत माध्यमांना म्हणाले की, ‘उदय सामंतांनी 2021 ला मंत्रीपदावर असताना रिफायनरी कशी विनाशकारी आहे, याचे दुष्परिणाम किती भयानक आहेत हे जाहीर व्यासपीठावर सांगितले आहे. मात्र आज सत्तेसाठी लाचर होऊन ते ही गोष्ट कदाचित विसरले असले तरी लोक विसरलेले नाहीत.’
आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा
रिफायनरीच्या सर्व्हेला बारसूच्या ग्रामस्थांचा विरोध कायम असून बारसूच्या सड्यावर ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी या ग्रामस्थांसोबत चर्चा करण्याचे ठरवले आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ग्रामस्थांची न्यायालयाने जामीनावर सुटका केली.