रत्नागिरी – बारसू रिफायनरीच्या माती परीक्षणावरून बारसूमध्ये दिवसभर पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात आज दिवसभर रणरणत्या उन्हात जोरदार संघर्ष झाल्यावर संध्याकाळी आंदोलकांनी हे आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित केले. परंतु तीन दिवसांत माती परीक्षणाचे काम न थांबल्यास पुढील आंदोलन बेमुदत असेल, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थ काशिराम गोर्ले यांनी दिली.
बारसूमध्ये आज अचानक रिफायनरीसाठी माती परीक्षण करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे लक्षात येताच आंदोलक ग्रामस्थ आणि पोलीस समोरासमोर आले. आंदोलकांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तोडून परीक्षण सुरू असलेल्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले. यावेळी अश्रूधुराचाही वापर करण्यात आला. यात काही आंदोलक जखमी झाले. तर काही आंदोलकांना कडक उन्हाचाही फटका बसून भोवळ आली. पोलिसांनी महिला आंदोलकांनाही मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दोन गाड्यांमध्ये बसवून आंदोलकांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले तरी बाकी आंदोलक हटत नव्हते. या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलकांना चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. परंतु माती परीक्षण थांबवण्याचे कुठलेही आश्वासन दोघांनीही दिले नाही. त्यामुळे आंदोलक भडकले होते.
आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, सकाळी ते बारसूला पोहोचले. त्यांनी माती सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी बारा वाजता मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनीही माती सर्वेक्षण सुरू होते,
त्या दिशेने धाव घेतली. यात अनेक वृद्ध महिलाही होत्या. पोलिसांनी आंदोलकांना अडवल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लाठीमारही केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यामुळे आंदोलक आक्रमक होत पोलिसांशी वाद घालू लागले. हे आंदोलन चार ते पाच तास सुरू होते. पोलिसांनी 400 आंदोलकांना ताब्यात घेतल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला. आंदोलन चिघळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना फोन करून माहिती जाणून घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांवर लाठीमार केलाच नाही, असे सांगत आंदोलकांना चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांच्या संमतीनेच प्रकल्प राबवला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले. उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले की, लोकांची डोकी भडकावण्याचे काम सुरू असून बाहेरचे लोक आंदोलनात सहभागी झाली आहेत. सरकार चर्चेसाठी तयार आहे. माती परीक्षण झाल्यावरच हा प्रकल्प इथे होऊ शकतो की, नाही याचा निर्णय होऊ शकतो. माती परीक्षण म्हणजे काम सुरू असे होत नाही, असे उदय सामंत वारंवार सांगत होते. चर्चा करू, असेही म्हणत होते. पण संध्याकाळपर्यंत ग्रामस्थ आंदोलनावर ठाम होते. धोपेश्वर येथील ग्रामस्थ यांनी पत्रकारांना माहिती दिली की, या भागातील नव्वद टक्के ग्रामस्थांचा रिफायनरीला विरोध आहे. माती सर्वेक्षण करू नये, असे ग्रामपंचायतीचे ठराव झाले आहेत. संघटनेच्या कुणालाही आतापर्यंत सरकारने चर्चेला बोलावले नाही. आम्ही अनेक पत्र लिहिली, पण सरकारने प्रतिसाद दिला नाही. आजही ग्रामपंचायतला न सांगता माती परीक्षणाला आले आहेत. लाल श्रेणी म्हणजे प्रदुषणकारी असा कोणताही प्रकल्प कोकणात नको, असा धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा, असे आंदोलकांचे म्हणणे होते. अखेर यावर तोडगा निघून आंदोलन तीन दिवस स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांनी आंदोलकांनी जिथे मोर्चा काढला त्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक सरळ तिथून निघून गेले.
अजित पवारांचा रिफायनरीला पाठिंबा?
या प्रकल्पामुळे लाखो नोकर्या निर्माण होणार आहेत. एन्रॉनला राजकीय दृष्टीने विरोध झाला होता. काही पक्ष म्हणतात की, आम्ही स्थानिकांच्या बाजूने आहोत. तिथे काहींचा विरोध आहे. पण त्यांच्यापैकीच राजन साळवी त्या भागाचे नेतृत्त्व करीत आहेत. चार पाच लाख लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणारे पाठिंबा देत आहेत. तेव्हा सरकारच्या चर्चेतून मार्ग निघू शकतो. तिथे दूरगामी नुकसान होणार नसेल, एकही गाव किंवा घर उठवले जात नाही तर शहानिशा करावी. राष्ट्रवादीची भूमिका विकासाच्या बाजूने आहे. सरकारने विरोधकांशी चर्चा करावी. मुख्यमंत्री आणि शरद पवारांची चर्चा झाली तेव्हा पवारांनी काही सूचना दिल्या.
सुषमा अंधारेंनी केली बारसू परिसरातील जमीन खरेदी करणार्यांची यादी जाहीर
ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी बारसू जमीन खरेदी करणार्यांची यादीच दाखवली. यात बहुतेक उच्चपदस्थ अधिकारी व परप्रांतीयांचा समावेश असल्याचे सांगत, यावर सोमय्या काय बोलणार? असा सवाल त्यांनी विचारला.
अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, दुर्गा अनिल कुमार डोंगरे – 137 गुंठे, अखिलेश हरिश्चंद्र गुप्ता आणि नमिता अखिलेश गुप्ता – 92 एकर (अधिकारी) , आकांक्षा संजय बाकाळकर – 113 गुंठे, धार्मिल झवेरी – 3 हेक्टर, सोनल पिकेश शहा – 7.5 हेक्टर, विकेश वसंतलाल शहा – 156 गुंठे, 7 ) निकेश शहा – 3 हेक्टर, रुपल विनीतकुमार शहा – 4 हेक्टर, अपर्णा तेजस शहा – 10 हेक्टर, देवेंद्र शर्मा – 4.5 हेक्टर, अनुराधा रेड्डी – 5 हेक्टर, सोनल शहा – 2 हेक्टर, श्रीकांत मिश्रा – 2 हेक्टर, देवेंद्र शर्मा – 6 हेक्टर, शशिकांत वालचंद शहा – 4.5 हेक्टर, नरेंद्र सिसोदिया – 4.5 हेक्टर, आशिष रणजित देशमुख- 18 आणि आयआरएस अधिकारी अखिलेश गुप्ता व नमिता गुप्ता यांनी बारसूमध्ये 92 एकर जमीन खरेदी केली आहे. जमिनी घेणार्यांमध्ये मराठी किती आहेत तेही बघा, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या नावावर 18 एकर जमिनीची खरेदी करण्यात आली आहे. यावर खुलासा करताना आशिष देशमुख म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी शेतीसाठी ही जमीन खरेदी केली आहे. या जमीन खरेदीमध्ये काहीही बेकायदेशीर नाही. मी मुळात शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणून मी राज्यात कुठेही जमीन खरेदी करू शकतो. या परिसरात डेअरी प्लांट उभारण्याचा माझा
विचार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेच्या बैठकीत रिफायनरी प्रकल्पासाठी भूसंपादनाचा कोणताही प्रस्ताव आल्यास त्याला विरोध करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. त्यासाठी एक ठराव मंजूर झाला आहे. माझ्या मते, हा प्रकल्प गावकर्यांवर लादू नये, त्याचा विपरित परिणाम होईल, असेही ते म्हणाले.