मुंबई – राज्यात दसरा सणाची धामधूम सुरू असताना आज रात्री वांद्रे पूर्वच्या खेरवाडी सिग्नल येथे अजित पवार गटाचे आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली.
त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ ते रात्री 9.30 वाजता जाहीर कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी फटाके लावण्यात आले होते. त्याआडून दुचाकींवर आलेल्या तीन तरुणांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.
त्यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. ते खाली कोसळले. त्यांच्या सहकार्याच्या पायालाही गोळी लागली. त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या समर्थकांची लीलावती रुग्णालयाबाहेर गर्दी झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता संजय दत्त आणि भाजपाचे नेते आशिष शेलारदेखील रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांनी बंदोबस्त लावला. उपमुख्यमंत्री अजित पवारही लिलावती रुग्णालयात दाखल झाले. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता, असा संशय पोलिसांना आहे. तीन आरोपींपैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, ही गंभीर घटना आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. हा गोळीबार का झाला हे उघड झाले पाहिजे. अंबादास दानवे यांनी म्हटले की, सत्ताधारी नेत्यावर गोळीबार होणे ही गंभीर बाब आहे. राज्यातील कायदा- सुव्यवस्था
ढासळली आहे.