बाबरी शिवसेनेने पाडली असा दावा करू नये चंद्रकांत पाटलांचा दोनदा आरोप! उद्धव भडकले

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौर्‍यात शक्‍तिप्रदर्शनानंतर आता बाबरी मशीद कोणी पाडली या प्रश्नावरून राजकारण रंगले आहे. शिवसेनेचा बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे बाबरी मशीद शिवसेनेने पाडली असा दावा करू नये, असे भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील काल म्हणाले आणि खळबळ माजली. त्यावर संतप्त झालेल्या उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचा राजीनामा मागितला. यानंतर पाटील सारवासारव करतील अशी अपेक्षा होती, पण आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तेच वक्तव्य केले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी किंवा अन्य भाजपा नेत्यांनी यावर मौन पाळले. मात्र, शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत हे भाजपात नसतानाही म्हणाले की चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य म्हणजे भाजपची भूमिका नाही.
भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल म्हणाले की, बाबरी मशीद पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटले की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते का? शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होते? कारसेवक कोण होते? कारसेवक हे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या नेतृत्वाखाली गेले होते. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते. ते हिंदू होते. त्यामुळे आम्ही बाबरी पाडली असा दावा शिवसेनेने करू नये.’ चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आणि ठिणगी पडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते. सध्याचे पंतप्रधानही कुठेच नव्हते. भाजपचे तत्कालीन उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारींनी जाहीर केले होते की, बाबरी पाडण्याचे काम शिवसैनिकांनीच केले. बाबरी पाडली असेल तर त्याचा आम्हाला अभिमानच आहे असे बाळासाहेब म्हणाले होते. मुघलांचा इतिहास पुसता पुसता भाजप आता हिंदूंचाही इतिहास पुसू लागला आहे. भाजपचे गोमुत्रधारी हिंदुत्व देशाच्या कामाचे नाही. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. बाळासाहेबांचा अपमान करणार्‍या पाटलांचा सत्तेसाठी लाचारी करणार्‍या मिंधे मुख्यमंत्री यांनी राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर मिंधे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. चंद्रकांत पाटील मस्तीत आहेत. अशा लोकांसोबत हे मिंधे राहणार आहेत का? आता ते स्वत:च्या जोड्याने स्वत:चे थोबाड फोडणार का? चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत भाजपा बोलत आहे. त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे महत्त्व कमी करायचे आहे.
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद संपताच चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेतली. आपले वक्तव्य ते मागे घेणार असे वाटत असतानाच त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे सांगत पुन्हा तेच वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंविषयी माझ्या मनात श्रद्धा आहे. बाळासाहेबांमुळे हिंदुत्वासारख्या विषयांना चालना मिळाली. दंगलीवेळी बाळासाहेबांमुळेच मुंबईतला हिंदू जिवंत राहिला. याआधीही अनेकदा बाळासाहेबांविषयी बोलताना मी त्यांचे ऋणच व्यक्त केले आहे. या मुलाखतीतही मी ती श्रद्धा व्यक्त केली आहे, पण विषय अयोध्येचा आहे. बाबरी ढाचा पाडण्याचा विषय आहे. 1983 पासून हे आंदोलन विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून झाले. तीन वेळा प्रयत्न झाले. आधी दोन वेळादेखील विहिंपच्या नावाने हे आंदोलन झाले. हे शिवसेनेचे आंदोलन आणि हे शिवसेनेचे नाही असा मुद्दा नव्हता. बाबरी पाडली तेव्हा तेथे उपस्थित सर्व हिंदू होते. मुद्दा असा आहे की ढाचा पाडला तो हिंदूंनी पाडला, विहिंपने नेतृत्व केले. बाबरी मशीद पाडताना शिवसैनिक होते की नव्हते हा मुद्दा नाही. मला बाळासाहेबांचा अनादर करायचा नाही. बाळासाहेबांचा अवमान केला हा आरोप मी सहन करणार नाही. बाळासाहेबांचे मुंबईतल्या मराठी, हिंदू माणसावर असलेले ऋण आम्ही जाणतो. बाळासाहेब तसेच मातोश्रीबद्दलही मला आदर आहे. उद्धवजींनी जे म्हटले त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणार नाही. विहिंपच्या नेतृत्वाखाली हा बाबरीचा तिसरा संघर्ष होता. भाजपादेखील विहिंपच्याच नेतृत्वाखालीच तेथे काम करत होता. तेथे सर्व हिंदू म्हणून होते. म्हणून बाबरी पाडली तेथे शिवसेना होती आणि शिवसेनेने ढाचा पाडला असा दावा करू नये.’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माध्यमांनी या वादाबद्दल विचारता ते म्हणाले, ‘अयोध्येत राम मंदिर आणि जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण केले आहे. मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांचा रोख आताच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे (उद्धव ठाकरे) आहे. बाबरी मस्जिद पाडली तेव्हा हे कोठे होते, असे पाटील यांना म्हणायचे होते.’
पाटील यांच्या बाबरीसंबंधीच्या आरोपांनंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रियाही आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील आतापर्यंत कुठे होते? बाबरी पाडली तेव्हा ते तिथे होते का? त्यांच्या बोलण्यावर आपण विश्वास कसा ठेवायचा? शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे संपूर्ण भाजपाचे वक्तव्य असे समजण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री त्यांच्याशी याविषयी बोलतील.’
बाळसाहेबांच्या मुद्यावर उद्धव-राज एकत्र
बाबरीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला राज ठाकरेंनी दुजोरा दिला आहे. राज यांच्या भाषणाचा व्हिडिओ मनसेच्या ट्विटर हँडलवर आज शेअर केला. ट्विटमध्ये लिहिले आहे, ’अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभे करणार्‍यांनी राजसाहेबांनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा!’ बाबरी पाडली तेव्हा बाळासाहेबांना आलेल्या फोनचा प्रसंग व्हिडिओत राज ठाकरे यांनी सांगितला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top