मुंबई – महाराष्ट्रातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. यात 147 जागांमध्ये मविआ 81 व भाजपा शिंदे गट 48 असे एकूण चित्र असले तरी प्रत्येक पक्षाचे गणित बघता ‘शहरी पक्ष’ म्हणून ओळख असलेल्या भाजपाने पहिले स्थान पटकावत ग्रामीण भागात मुसंडी मारली आहे. ‘मराठी मनांवर राज्य करणार्या’ शिंदे आणि ठाकरे गटाचा धुव्वा उडाला आहे तर ग्रामीण भागाच्या जीवावर राजकारण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसर्या क्रमांकावर गेला असून, काँग्रेस पक्ष तिसर्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
या निवडणुकांमध्ये 40 समित्या जिंकत भाजप पहिल्या क्रमांकावरचा पक्ष ठरला. राष्ट्रवादी 38, तर काँग्रेस 32 समित्यांवर विजयी होऊन दुसर्या व तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. शिवसेना ठाकरे गट 11 आणि शिंदे गट केवळ 8 जागा जिंकू शकले. बंडखोर व इतरांनी 18 जागा जिंकल्या. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात काही नेत्यांना अनपेक्षित धक्के बसले. तर काही नेत्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले. विरोधी पक्षनेते अजित पवार (बारामती), अशोक चव्हाण (भोकर), डॉ. मधुसूदन केंद्रे (गंगाखेड), शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील व शशिकांत शिंदे (जावळी-महाबळेश्वर), जयंत पाटील (सांगली-इस्लामपूर-विटा), धनंजय मुंडे (परळी-अंबाजोगाई), छगन भुजबळ (नाशिक), बाळासाहेब थोरात (संगमनेर), यशोमती ठाकूर (तिवसा), जयकुमार रावल (दोंडाईचा) यांनी आपापल्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपले गड शाबूत ठेवले, तर माजी मंत्री पंकजा मुंडे, रवि राणा, खासदार प्रताप चिखलीकर, रत्नाकर गुट्टे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, आमदार एकनाथ खडसे, अनिल बोेंडे, विद्यमान मंत्री संजय राठोड, विद्यमान मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, नाना पटोले, बच्चू कडू, मदन येरावार, निलय नाईक, बाळू धानोरकर यांना धक्का बसला.
या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, बाजार समितीच्या निवडणुकीत मविआची ताकद दिसून आली आहे. भारतीय जनता पक्ष हा शेतकरी विरोधी आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल करून ठेवले आहे. त्यामुळे देशात भाजप विरोधी लाट आहे. या निवडणुकीत मतदारांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीचा विधानसभा निवडणुकांशी काही संबंध नाही. सर्व निवडणुका वेगळ्या आहेत. कुठलीही लिटमस टेस्ट वगैरे नाही, असे सांगत म्हटले की, बाजार समिती निवडणूक पक्षीय राजकारणात होत नाही. सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक होतात. भाजप-सेनेला काही ठिकाणी यश मिळाले आहे तर काही ठिकाणी स्थानिक यश मिळाले आहे. काही लोक महाविकास आघाडीला यश मिळाल्याचे फटाके फोडत आहेत, पण असे काही नाही. चांगले लोक निवडून आले पाहिजे. जे निवडून आले त्यांना शुभेच्छा.
एकूण 147/147
भाजपा – 40
राष्ट्रवादी – 38
काँग्रेस – 32
ठाकरे गट – 11
शिंदे गट – 8
इतर – 18
मविआ – 81
भाजपा + शिवसेना-48