छतरपूर – साईबाबांवर वादग्रस्त विधान करून लाखो साईभक्तांच्या टीकेचे लक्ष्य बनलेल्या बागेश्वरधामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे. बागेश्वर धाम सरकारचे पीठाधिश्वर महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या वक्तव्यावरून वारंवार चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त माहिती सांगितली होती. तर नुकतेच शिर्डीचे साईबाबा यांच्यावरही त्यांनी असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर देशभरातून साईभक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, साईबाबा संत असू शकतात पण त्यांना देव म्हणता येणार नाही. धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यावरून खळबळ उडाली होती, त्यानंतर त्यांनी आता माफी मागितली आहे.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, आमच्या शंकराचार्यांनी जे सांगितले होते त्याचा आम्ही पुनरुच्चार केला. साईबाबा संत-फकीर असू शकतात आणि लोकांचा त्यांच्यावर वैयक्तिक विश्वास आहे. जर कोणी संत गुरुंना देव मानत असेल तर ती त्यांची वैयक्तिक श्रद्धा आहे. यात आमचा कोणताही आक्षेप नाही. माझ्या कोणत्याही बोलण्याने कोणाचे मन दुखावले असेल, तर त्याबद्दल मला मनापासून वाईट वाटत असल्याने मी माफी मागतो, असे धीरेंद्र शास्त्रींनी म्हटले आहे.