नाशिक -बागलाण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे हरणबारी धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने मोसम नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे मोसम नदी काठावरील अंबासन येथील पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे गाव, शेतशिवारासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
या घटनेनंतर अंबासन ग्रामपंचायत प्रशासनाने ‘ऐका…हो…ऐका, गावातील मोसम नदीपात्रातील पुलाला भगदाड पडल्याने पुल बंद करण्यात आला आहे’, अशी दवंडी पिटवत या पुलावरून कोणीही आपली वाहने व रहदारी करू नये असे आवाहन केले आहे. रस्ता बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. त्याचप्रमाणे धरणांच्या पाणी साठ्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रात्री ८ वाजता ६२८२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नांदूरमधमेश्वर धरणातून १,६१४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर हरणबारी धरणातून शुक्रवारी मोसम नदीतून ५,००० क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर हा विसर्ग ७ हजार क्युसेक पर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
बागलाण तालुक्यातील मोसम नदीवरील पुलाला मोठे भगदाड
