भागलपूर – बिहारमध्ये अंतिम टप्प्यात बांधकाम आलेला एक पूल कोसळल्याची घटना काल रविवारी सायंकाळी घडली. तब्बल १७१७ कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अवघ्या काही क्षणांत पुलाला जलसमाधी मिळाली आहे. हा पूल कोसळताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या अपघाताची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
खगडिया आणि भागलपूर जिल्ह्यांना जोडणारा हा पूल सुलतानगंजमध्ये गंगा नदीवर बांधण्यात येत होता. या चौपदरी पूलाचे ३० हून अधिक स्लॅब म्हणजेच सुमारे १०० फुटांचा भाग काल रविवारी सायंकाळी ६ वाजता कोसळला.हा पूल कोसळला,त्यावेळी तिथे अनेक जण हजर होते. अवघ्या काही सेकंदात हा पूल नदीत कोसळला आहे.
हा पूल बांधण्यासाठी तब्बल १७१७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.या पुलाचा पायाभरणी समारंभ २०१५ मध्ये नितीशकुमार यांच्याच हस्ते पार पडला होता. हा पूल २०२० मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. या पुलाचा काही भाग एप्रिल महिन्यातही कोसळला होता. हा पूल मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. तरीही रखडलेला हा पूल निकृष्ट बांधकामामुळेच कोसळल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे.तर दुसरीकडे या घटनेने मुख्यमंत्री नितीशकुमार हे निराश आणि संतप्त झाले आहेत.
बांधकाम सुरू असलेला बिहारमधील पूल गंगेत कोसळला!१७१७ कोटी पाण्यात
