ढाका – बांगलादेशमध्ये जुलै महिन्यापासून आरक्षणविरोधात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला होता. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे ६५० जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार, अटक आणि न्यायालयीन कोठडीत मृत्यूंच्या घटनांचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शकपणे व्हायला हवा, असे संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
बांगलादेशातील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राने काल १० पानी अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, १६ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे ४०० जणांचा मृत्यू झाला. ५-६ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारात सुमारे २५० लोकांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये आंदोलक, पत्रकार आणि विविध दलांचे सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. या हिंसाचारात हजारो लोक जखमीही झाले आहेत. रुग्णालयांना माहिती देण्यापासून रोखण्यात आले आहे. अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याने माहिती गोळा करण्यात अडचणी आल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
आरक्षणाविरोधी निदर्शनादरम्यान सुरक्षा दलांकडून मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात आले. धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधात लूटमार, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय अवामी लीगच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची सूडाच्या भावनेतून हत्या करण्यात आली. बांगलादेशमध्ये वेगाने कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्याची आणि हिंसाचाराच्या दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.