नाशिक- बांगलादेशमधील अराजकतेचा फटका कांदा निर्यातीला बसत आहे. हिंसक घटनांमुळे भारताने बांग्लादेश सीमा सील केली आहे. त्यामुळे सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली होती.
नाशिकमधून दररोज ५० ते ६० ट्रक कांदा घेऊन बांगलादेशकडे रवाना होतात. मात्र सीमा सील असल्यामुळे कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झालेत आहेत. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करतो. त्यामुळे शेतमाल निर्यातीवर परिणाम होत आहे. सीमा सुरू होण्यासाठी आणखी सहा दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे.
कांदा उत्पादकाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दखल घेतली आहे. त्यांनी बांगलादेश सीमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. बांगलादेशची सीमा खुली करून दळणवळण सुरळीत व्हावे, यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारसोबत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे, असेही राजू शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे.