ढाका – बांगलादेशच्या पूर्व भागात ३० वर्षातील सर्वात विनाशकारी पूर आला असून १२ जिल्ह्यातील सुमारे ४८ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. आतापर्यंत त्यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने बांगलादेशातील पुरावर चिंता व्यक्त करत मदतीचा प्रस्ताव दिला आहे. कालच बांगलादेशने या पुरबद्दल भारताला जबाबदार धरले होते.
बांगलादेशमध्ये पावसामुळे लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. फेनी जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पाऊस सुरूच राहिल्याने पुढील २४ तासांत पाण्याची पातळी आणखी वाढू शकते अशी शक्यता पूर अंदाज आणि चेतावणी केंद्राने व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काल बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना पत्र लिहिले आहे. त्यात, ज्यांनी आपले प्रियजन, घरे आणि नोकऱ्या गमावल्या आहेत अशा पूरग्रस्त लोकांच्या पाठीशी पाकिस्तान धैर्याने उभा आहे. आम्ही बांगलादेशला कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयार आहोत, असे नमूद केले आहे.
भारताने डांबूर धरणाचे दरवाजे जाणूनबुजून उघडल्याने बांगलादेशमध्ये भीषण पूर आला. भारताला बांगलादेशातील लोकांची पर्वा नाही, असा आरोप बांगलादेश सरकारकडून करण्यात आला आहे. सोशल मीडियावरही भारताविरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला जात आहे. भारताने पाणी सोडल्याने बांगलादेशात पूर आल्याचे सांगत धरणाचे जुने व्हिडिओ फिरवले जात आहेत. यावर त्रिपुरातील डांबूर धरण उघडल्यामुळे पूर आल्याची अफवा बांगलादेशात आहे. मात्र हे खरे नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.