ढाका – बांगलादेशातील हिंसाचार आता बऱ्याच अंशी आटोक्यात आला असला तरी लुटमारीच्या घटना सुरूच आहेत. दंगलखोरांकडून केली जाणारी लुटमार रोखणयासाठी स्थानिक नागरिक पहारा देत आहेत.बांगलादेशात झालेल्या उठावानंतर येथील पोलीस दलाने काम करणे बंद केले होते. बांगलादेशातील नवे पोलीस प्रमुख ए के एम शहीदूर रहमान यांनी पोलिसांना परत कर्तव्यावर दाखल होण्याचे आवाहन केले आहे.माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात हिंसाचाराच्या तुरळक घटना सुरुच असून जनजीवन अद्यापही सुरळीत झालेले नाही.लष्कर प्रमुख वकार उज जमा यांनी येत्या चार दिवसात बांगलादेशातील स्थिती सामान्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जमा यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहन केले आहे. बांगला देशातील भारतीय व्हिसा केंद्र पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहेत. काळजीवाहू प्रमुख मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशात लवकरच निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे. बांगला देशाच्या हंगामी सरकारच्या सल्लागार समितीत १५ सदस्यांचा समावेश केला जाणार आहे.