चंद्रपूर – मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीचा म्होरक्या आणि कुख्यात शिकारी अजित राजगोंडला आज पोलिसांनी राजुरा तालुक्यात अटक केली. बहेलिया टोळीवर २०१३ ते २०१५ या कालावधीत विदर्भातील जवळपास १९ वाघांची शिकार केल्याचा आरोप आहे. या शिकारीमागे अजित व त्याचे दोन भाऊ केरू व कुट्टू यांचा सहभाग असल्याची पोलीस व वनविभागाची माहिती आहे.
दरम्यान, २०१५ मध्ये वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने तिरुपती येथून अजित राजगोंडला अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून अजितला शिक्षाही ठोठावली. त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. अजित या भागात किती दिवसांपासून वास्तव्यास आहे, त्याने या भागातील वाघांची शिकार केली आहे का, त्याच्या टोळीचे आणखी किती सदस्य या भागात वावरत आहेत असे अनेक प्रश्न त्याच्या अटकेमुळे निर्माण झाले आहेत. या प्रकरणी वन विभागाचे विशेष पथक अजित राजगोंडची कसून चौकशी करत आहेत.
बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडला अटक
