तिरुअनंतपुरम – एका अभिनेत्रीने केलेल्या बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला मल्याळी अभिनेता मुकेश याला केरळच्या एर्नाकुलम सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात मुकेश याच्यासह मल्याळम मुव्ही आर्टीस्टस असोसिएशनचा माजी पदाधिकारी एडावेला बाबू याच्यावरही या अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला आहे. बाबू याच्यावरही पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून त्यालाही न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
मल्याळी चित्रपटसृष्टीतील महिलांच्या लैंगिक शोषणाबाबत चौकशी करून न्या. के हेमा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकताच अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालातून मल्याळी चित्रपटसृष्टीचा विकृत चेहरा समोर आला आहे. हा अहवाल प्रसिध्द झाल्यानंतर या अभिनेत्रीने पुढे येत चित्रपटसृष्टीतील अनेक जणांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.