बनावट टीईटी प्रमाणपत्रप्रकरणी महिला शिक्षिकेवर गुन्हा दाखल

नाशिक :- राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घोटाळा गाजला असताना नाशिकमध्येही महिलेने शिक्षिकेच्या नोकरीसाठी बनावट टीईटी प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली आहे. शिक्षण विभागाच्या पडताळणीत ही बाब उघड झाली. मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे पाडा येथील महिला शिक्षिका तेजल रवींद्र ठाकरे यांच्याविरोधात दोन वर्षांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

तेजल ठाकरे यांनी शिक्षकाच्या नोकरीसाठी 1 जून 2017 रोजी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नोकरीसाठी टीईटीचे बनावट प्रमाणपत्र दिले होते. परंतु त्यानंतर 2018 मध्ये राज्यात टीईटी परीक्षेतील महाघोटाळा उघड झाल्याने शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी होत होती. याचवेळी मालेगाव तालुक्यात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या तेजल ठाकरे यांचेही कागदपत्र तपासणीसाठी आले होते. तपासा दरम्यान टीईटी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे राज्यात 2018 पूर्वी ही टीईटीच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट कार्यरत असल्याची धक्कादायक बाब या प्रकरणातून समोर आली आहे. दरम्यान, राज्य परीक्षा परिषदेने 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांकडे संबंधित महिलेचे प्रमाणपत्र बोगस असल्याने कारवाई करून अहवाल पाठवण्याच्या आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशांची अंमलबजावणी होऊन गुन्हा दाखल होण्यास दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

Scroll to Top